अर्थभयाचे आव्हान

लोकसत्तामंगळवार, ११ सप्टेंबर २०१२


आर्थिक चणचण नाउमेद करते. व्यक्तीला. तसेच देशालाही. जगातल्या एकमेव महासत्तेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बराक ओबामा यांना एव्हाना याची जाणीव झाली असेल. ओबामा यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले.
त्यात पक्षाचे अध्यक्षीय पदाचे उमेदवार म्हणून ओबामा यांची अधिकृत निवड करण्यात आली आणि त्यानंतर ओबामा यांनी पक्षास आणि अमेरिकेस उद्देशून भाषण केले तेव्हा अनेकांना त्यांच्या २००८ सालातील भाषणाची आठवण झाली. आशेचे स्वप्न दाखवीत उत्साहाने सळसळत्या ओबामा यांच्या त्या वेळच्या भाषणाच्या तुलनेत आताचे भाषण अनेकांना खूपच फिके वाटले. स्वत: ओबामा यांनाही याची जाणीव असावी. कारण त्यांनी आपण तेव्हा उमेदवार होतो आणि आता अध्यक्ष आहोत, असे सुरुवातीसच नमूद केले. सत्ता राबविताना समजणारे वास्तव बदल घडवते. सत्ता दाखवण्यासाठी आधी स्वप्ने विकलेली असतात. पण सत्ता मिळाल्यावर तीच स्वप्ने पूर्ण करताना तोंडाला फेस येतो. तसा तो आता ओबामा यांच्या तोंडाला आला आहे. फरक इतकाच की गेल्या खेपेस निवडणुकीत ओबामा यांनी स्वप्ने दाखवली नव्हती. तर युद्धाने श्रमलेल्या आणि धाकटय़ा जॉर्ज बुश यांच्या विचारशून्य कारभाराने गांजलेल्या अमेरिकी जनतेस बदलाची
आशा दाखवली होती. होय आपण बदलू शकतो, या त्यांच्या उद्घोषणेस चार वर्षांच्या कारकीर्दीने अगदीच हरताळ फासला असे म्हणता येणार नाही. ओबामा यांनी जे काही केले त्यापेक्षा अधिक अन्य काही कोणी करू शकला असता असेही नाही. याचे कारण असे की माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांची रिपब्लिकन राजवट संपुष्टात येताना त्यांनी अमेरिकी सरकारला खंक करून टाकले होते. इराकवर लादले गेलेले युद्ध आणि त्या विरोधात नाराजी कमी व्हावी यासाठी देऊ केलेल्या अव्यवहार्य करसवलती यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला चांगलीच धाप लागली होती. परिस्थिती इतकी बिकट होती की, अमेरिकेचे उत्पन्न आणि सरकारच्या डोक्यावरचे कर्ज यांचे प्रमाण समान झाले आणि पुढे तर कर्ज हे उत्पन्नापेक्षा अधिक झाले. ओबामा २००८ साली सत्तेवर येत असताना अमेरिकेत बँका बुडायला सुरुवात झाली होती आणि त्या वेळच्या आर्थिक खाईतून देशाला आधी वाचवणे आणि मग वर काढणे हे त्यांच्यापुढचे मोठे आव्हान होते. ते पेलताना आपण दाखवलेली स्वप्ने पूर्ण होणार नाहीत याची पूर्ण जाणीव ओबामा यांना झाली असणार. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या पक्षाच्या गेल्या आठवडय़ातील अधिवेशनात पडले. तेव्हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सध्या असलेल्या काजळीची छाया सत्ताधारी पक्षावर पडणे साहजिकच म्हणायला हवे. फाटक्या खिशाची जाणीव असेल तर फार मोठी स्वप्ने पाहता येत नाहीत. ओबामा यांचे तसे झाले आहे. २००८ सालच्या भारून टाकणाऱ्या भाषणात तब्बल ३२ वेळा वेगवेगळय़ा निमित्ताने वचन हा शब्द आला होता. परंतु यंदाच्या भाषणात हा वचन शब्द फक्त सात वेळा अवतरला. हे वास्तवाचे भान होते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा कडेलोट होण्यापासून आपण वाचवल्याचा दावा त्यांनी केला. परंतु तरीही माझ्या मर्यादांची मला जाणीव आहे, हेही त्यांनी सांगितले. हा फरक अध्यक्षीय पदाच्या जबाबदारीने त्यांच्यात घडवला. हे वास्तवाचे भान इतके होते की पुढील आणखी काही वर्षे तरी अमेरिकेला या संकटातून बाहेर पडता येणार नाही, इतकी स्वच्छ कबुली त्यांनी दिली. ‘मी ज्या मार्गाने अमेरिकेस घेऊन जाऊ इच्छितो तो मार्ग सोपा आणि सहज आहे, असा दावा मी करणार नाही, कारण माझ्याकडे तसा कोणताही मार्ग नाही,’ अशा शब्दांत ओबामा यांनी आपली परिस्थिती विशद केली. निवडणूकपूर्व भाषणात आश्वासनांचा पाऊस पाहायची सवय झालेल्या आपणास इतक्या कबुलीची सवय नाही. अमेरिकेतही रिपब्लिकन पक्ष जी भरमसाट आश्वासने देत सुटला आहे त्या पाश्र्वभूमीवरही ओबामा यांचे हे सत्यकथन कौतुकास्पद म्हणायला हवे. पण ते एवढेच करून थांबले नाहीत, तर पुढे जाऊन आपल्या समर्थकांना म्हणाले : तुम्हाला जे ऐकायला आवडेल तेच ऐकवण्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेले नाही. मी निवडून आलो आहे ते सत्य सांगण्यासाठी आणि ते सत्य हे आहे की प्रगतीच्या वाटेने घोडदौड करण्याची अवस्था पुन्हा येण्यासाठी आपणास आणखी काही वर्षे वाट पाहावी लागेल. निवडणुकीच्या तोंडावर असे सत्य कथन करण्यास धाडस लागते. ओबामा यांनी ते केले. त्याचमुळे गत निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे या वेळचे भाषण पडल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होते. 
त्यामुळे या अधिवेशनात खरे भाव खाऊन ग्ेाले ते माजी अध्यक्ष बिल क्लिंटन. वास्तविक क्लिंटन यांची प्रकृती तितकीशी ठीक नाही. अनेकांना हृदयात स्थान दिल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांना हृद्विकाराचा त्रास गेल्या काही वर्षांत वारंवार झाला आणि अनेकदा शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले. परंतु तरीही आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत क्लिंटन यांचा अधिकार अबाधित आहे. त्यांची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकेस वैभवाच्या शिखरावर घेऊन जाणारी होती. त्यामुळे त्यांचे या अधिवेशनातील भाषण हे डेमोक्रॅटिक पक्षास प्रेरणा देणारे ठरले. क्लिंटन यांची या अधिवेशनातील लोकप्रियता इतकी होती की, अमेरिकेतील सात वृत्तवाहिन्यांनी त्याचे थेट प्रक्षेपण केले आणि त्या रात्री असलेला महत्त्वाचा फुटबॉलचा सामना सोडून जवळपास अडीच कोटी प्रेक्षकांनी ते टीव्हीवर पाहिले. या भाषणात क्लिंटन यांनी ओबामा यांची आणि त्यातही विशेषत: त्यांच्या आर्थिक धोरणांची, चांगलीच तरफदारी केली आणि ओबामा हे देशाला गतवैभव प्राप्त करून देण्यात नक्कीच यशस्वी होतील, असा आशावाद व्यक्त केला. त्यास चांगलाच प्रतिसाद मिळाला. डेमोकॅट्रिक पक्षाच्या अधिवेशनात माजी अध्यक्ष क्लिंटन होते तर ओबामा यांचे  प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे मित रोम्नी यांच्या अधिवेशनात वयस्कर अभिनेता क्लिंट ईस्टवुड हे हजर होते. त्यांनी मंचावर एकपात्री प्रयोग सादर केला. त्याचे चांगलेच हसे झाले. त्या तुलनेत असला काही आचरटपणा डेमॉक्रॅटिक पक्षाने केला नाही. त्या आधी अध्यक्ष ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या भाषणासही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचे निवेदन अमेरिकी जनतेच्या भावनेला हात घालणारे होते, पण भावनेने लडबडलेले नव्हते.
या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी डेमोक्रॅट्सचे अधिवेशन झाले आणि दुसऱ्याच दिवशी अमेरिकेतील बेरोजगारांची ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी जाहीर झाली. जुलै महिन्यात अमेरिकेत जवळपास ९६ हजार नवे रोजगार निर्माण झाले. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टची वाढ अत्यल्प आहे. जुलै महिन्यात रोजगारनिर्मिती ८.१ टक्क्यांनी वाढली तर ऑगस्ट महिन्यात ८.३ टक्क्यांनी. परंतु पूर्ण वर्षभराचा आढावा घेतल्यास गतवर्षीच्या तुलनेत रोजगारनिर्मितीचा वेग हा मंदच आहे आणि तो वाढवणे हे अमेरिकेसमोरचे  मोठे आव्हान आहे. आज ९/११ च्या स्मृती दिनी अमेरिकेत दहशतवादाविषयीच्या भीतीची जागा अर्थभयाने घेतली आहे. हे अर्थभयाचे आव्हान पेलणे अमेरिकेसमोरचे आणि त्यामुळे साऱ्या जगासमोरचेही, अधिक मोठे आव्हान आहे.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream