होममेकर ते आयएएस ऑफीसर

रश्‍मी झगडे (IAS)
लग्नानंतर एक मुलगी सांभाळून, संसार सांभाळत रश्‍मी झगडे यांनी त्यांच्या पतीच्या प्रेरणेने अभ्यास सुरू केला. सलग तीन अटेंम्प्टला पूर्व परीक्षाच फेल तर चौथ्या प्रयत्नात इंटरव्ह्यूपर्यंत मजल .आणि शेवटी पाचव्या प्रयत्नात 2010 साली त्या आयएएस झाल्या

* एक होममेकर ते आयएएस ऑफीसर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास.

प्रेरणा -
माझं लग्न झालं तोवर मला युपीएससी परीक्षेबद्दल काहीही माहिती नव्हतं. आज मी जे यश मिळवलं त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जातं ते माझे मिस्टर सिद्धार्थ झगडे यांना. त्यांनी मला या परीक्षेची माहिती दिली, प्रोत्साहन दिलं. लग्नानंतर मी माझं ग्रॅज्युएशन ( बीएससी) पूर्ण केलं. त्यानंतर मुलगी झाली. मुलगी 1 वर्षांची झाल्यावर मी खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरूवात केली. माझ्या सासूबाई आणि माझे आई-वडील यांचाही माझ्या यशात मोठा वाटा आहे.

पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी -
2003 साली मी युपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. जरी मी सलग तीन पूर्व परीक्षा फेल झाले तरी माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरूच होता. पूर्व परीक्षेचे भरपूर पेपर मी सोडवले. तसेच मुख्य परीक्षेसाठी मराठी लिटरेचर आणि भूगोल, तसंच जनरल स्टडिज या सगळ्या विषयांचे अगदी घड्याळ लावून पेपर सोडवले. त्याचा मला खूप फायदा झाला. स्टॅंडर्ड रेफ्रन्स बुकचं वाचन, संकल्पना नीट समजावून घेणे हे महत्वाचं आहेच.

ऑप्शन बदलण्याची रिस्क -
2004, 2005 आणि 2006 सलग तीन अटेम्प्टला मी पूर्व परीक्षाच पास होऊ शकले नाही. तेव्हा पूर्व परीक्षेसाठी माझा ऑप्शन भूगोल हा होता. त्यानंतर चौथ्या अटेंम्प्टला मी ऑप्शन बदलण्याची रिस्क घेतली. मी भूगोल हा विषय बदलून इतिहास घेतला. त्याचा मला फायदा झाला. चौथ्या प्रयत्नात मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली पण फायनल लिस्टमध्ये नाव नव्हतं. मी जशी ऑप्शन बदण्याची रिस्क घेतली तशी सगळ्यांनीच घ्यावी असं मी म्हणणार नाही. पण सतत अपयश येत असेल तर जरूर पुनर्विचार करावा. ऑप्शन निवडताना तुमची आवड, गती, उपलब्ध साहित्य, मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करावा. मी ऑप्शन बदलण्याचा मोठा धोका स्वीकारला. त्याचा मला नव्याने अभ्यास करावा लागला होता. अखेर पाचव्या प्रयत्नात मी भारतात 169 वी आणि महाराष्ट्रात 4 थी येत आयएएस झाले.

मुलाखतीची तयारी -
युपीएससीची जेव्हा मुलाखतीसाठी जाहिरात येते तेव्हा त्यात इंटरव्ह्यू असा शब्द न वापरता पर्सनॅलिटी टेस्ट असा शब्द वापरतात. माझं पेपर लिखाणाचं माध्यम मराठी होतं. त्यामुळे इंटरव्ह्यूपण मी मराठीतच दिला. पण मी मधून मधून इंग्लिशमधून उत्तरं देण्याचा प्रयत्न करत होते. मुलाखतीमध्ये ते ओपिनियन बेस्ड प्रश्‍नपण विचारतात. तुम्हाला सगळं काही माहिती असावं अशी त्यांची अपेक्षा नसते आणि ते शक्‍यही नाही. तुमचा अंतर्बाह्य प्रामाणिकपणा मुलाखतीमध्ये खूप महत्वाचा आहे.



यशाचं सूत्र -
संयम, जिद्द, चिकाटी, योग्य दिशेने केलेले बुद्धिमतापूर्ण प्रयत्न हेच यशाचं रहस्य आहे असं मी म्हणीन. हा अभ्यास करताना आम्हाला राहतं घर विकावं लागलं, शेती विकावी लागली, अभ्यासाचा तणाव होताच पण हिंमत न हारता आपल्याला हे करायचंय असं मी स्वत:ला सतत बजावत राहिले. पण ज्यावेळी सिलेक्‍शन झालं त्या क्षणी या सगळ्या कष्टांची भरपाई झाली होती.

रश्‍मी झगडे सध्या तामिळनाडू वेल्लोर इथे असिस्टंट कलेक्‍टर आहेत.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream