नितीन येवला (IFS)
परीक्षेत यश मिळविण्यासाठी जोखीम पत्करण्याची तयारी व कष्ट करण्याची जिद्द ठेवल्यास मराठी युवक युवतींना सहज यश प्राप्त होऊ शकते. असा विश्वास सन २००९ च्या नागरी सेवा परीक्षेत देशात १०६ व्या क्रमांकासह राज्यात दुसरा आलेल्या नितीन येवला यांनी व्यक्त केला !
नागरी सेवा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जोखीम पत्करण्याची तयारी व कष्ट करण्याची जिद्द ठेवल्यास मराठी युवक युवतींना सहज यश प्राप्त होऊ शकते. असा विश्वास सन २००९ च्या नागरी सेवा परीक्षेत देशात १०६ व्या क्रमांकासह राज्यात दुसरा आलेल्या नितीन येवला यांनी महान्यूजशी बोलतांना व्यक्त केला !
नाशिक जिल्हयातील मालेगांव मधील मी रहिवाशी आहे. भाऊ इंजिनिअर आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत मी गुणवत्ता यादीत आलो. इलेक्ट्रॉनिक ऍड टेलिकम्युनिकेशन विषयात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एका कंपनीत नोकरी पत्करली. खाजगी नोकरीत माझे मन रमत नव्हते. चांगल्या हुद्दाची नोकरी करावी. जेणेकरुन समाजसेवा करता येईल, असे विचार मनात घर करुन होते. पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागलो. अभियांत्रिकेचे विषय स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देऊ शकत नाही, याची मला जाणीव होती. चांगले गुण मिळवून देणारे विषय म्हणून समाजशास्त्र व राज्यशास्त्र हे दोन विषय ऐच्छिक विषय म्हणून मी निवडले.
इंजिनिअरिंग आणि कलाशास्त्राचे विषय, यांची सांगड घालणे सुरूवातीला अवघड गेले. पण दोन्ही विषयाचा अगदी बारकाईने अभ्यास केला. वेगवेगळया लेखकांची पुस्तके वाचली. वाचनासाठी बैठक आणि त्याविषयाची आवड असावी लागते. ते दोन्ही गुण माझ्या अंगी होते. हळूहळू विषय कळू लागले आणि नंतर ते सोपे वाटू लागले.
परीक्षा मात्र इंग्रजी भाषेत दिली. खरे पाहता माझे शिक्षण बारावीपर्यंत मराठी माध्यमामध्ये झाले होते. परंतु एकदा आवड निर्माण झाली की, इंग्रजी देखील सोपी वाटू लागते, हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. इंग्रजीचा तोटा कमी आणि फायदा जास्त असतो. इंग्रजीमध्ये संदर्भग्रंथ विपुल आहेत. शिवाय मुलाखतीच्या वेळी सरळसरळ संवाद साधता येतो.
वडील सुभाष व आई सुनीता येवला हे दोघेही शिक्षकी पेशातील असल्यामुळे सहाजिकच शिक्षणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाल होते. मात्र माझा आदर्श आई आहे. आईने विविध अभ्यासक्रमात प्राविण्य मिळविले असल्यामुळे आई मधील जिद्द व चिकाटी हे गुण नेहमी मला बळ देतात.
महाराष्ट्रातील तरुणांचे नागरी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, असे विचारले असता, महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या बोंगिरवार समितीच्या शिफारशींची गंभीरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासोबतच मुंबई, नागपूर, औरंगाबाद धर्तीवर सर्व जिल्हा पातळीवर प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची गरज आहे. हे झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल, असे वाटते. एखाद्या मुलगा जर अशा परीक्षांना बसण्यासाठी उत्सुक असेल तर त्याला समाजाने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनात ग्रामीण युवकांचा सहभाग वाढण्यास मदतच होणार आहे.
आर्थिक परिस्थितीवर मात करुन यश मिळविण्याचा आनंद वेगळाच असतो. जिद्द ठेवली पाहिजे. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. इंटरनेटमुळे तर जग जवळ आले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन मुलांनी तयारी केली पाहिजे. दररोज इंग्रजी व मराठी वृत्तपत्र आवर्जुन वाचले पाहिजे. त्याची टिपण काढली पाहिजे. समोर धेय्य ठेवून तयारी करायला हवी. स्पर्धा परीक्षा म्हणजे जोखीम वाटते. ती भीती सर्व प्रथम मनातून काढायला हवी. उलट वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. परीक्षा कुठलीच अवघड नसते. फक्त आपली तयारी पाहिजे.
मराठी लोक नेहमी संकोच बाळगतात. त्यांची रिस्क घ्यायची तयारी नसते. पण जिद्द, आत्मविश्वास व मेहनतीच्या जोरावर मराठी माणूस मोठी झेप घेऊ शकतो. युपीएससीची परीक्षा फार अवघड नाही. युवकांनी या परीक्षेला निश्चितपणे बसावे, असे मी आवाहन करतो.