नागालँडचे बांगलादेशीकरण

ब्रिगेडियर हेमंत महाजन । लोकसत्ता । शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२

नागालँडमधली ‘नागा राष्ट्रवादी’ चळवळ आणि आता शक्ती कमी झालेले आणि सरकारशी वाटाघाटी करणारे त्या चळवळीतील गट, याबद्दल अन्य राज्यांतील लोकांना माहिती असते, पण नागा जमातींपेक्षा ‘बांगलादेशी घुसखोर’ हीच या राज्यातील सर्वात मोठी जमात ठरत असल्याचे किती जणांना माहीत आहे? नागालँडच्या संदर्भात घुसखोरीचे हे आव्हान आसामपेक्षा वेगळे आहे, पण घुसखोरी थांबणे आसामवर अवलंबून आहे..

नागालँडमध्ये अनधिकृतपणे राहत असलेल्या बांगलादेशींवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालावा, असे आवाहन नागा परिषदेच्या पब्लिक अ‍ॅक्शन कमिटीने १४ ऑगस्टला केले. बांगलादेशी निर्वासितांना आपापल्या भागात कोणत्याही प्रकारे थारा देऊ नये, असे स्पष्ट करून १५ ऑगस्टपासून निर्वासितांविरोधात मोहीम चालवण्याची घोषणाच नागा परिषदेने केली. त्याआधी २९ जुलै रोजी याच परिषदेने केलेल्या ठरावात म्हटले होते : हा प्रदेश, येथील प्रत्येक स्रोत आणि आर्थिक व्यवहारही आमच्या मालकीचा आहे. त्याविषयी जनजागरण करून येथील प्रत्येक बाबतीत आमचे नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करू. 
आसाममध्ये झालेला हिंसाचार आणि बांगलादेशाची घुसखोरी सध्या चच्रेमध्ये असतानाच या घडामोडी नागालँडमध्ये घडल्या आहेत. अर्थात, आसाममध्ये झाली तशाच प्रकारची घुसखोरी नागालँड आणि त्रिपुरामध्येही सुरू आहे आणि त्यावर सरकारचे आणि माध्यमांचे फारसे लक्ष नाही. ईशान्य भारताच्या सात राज्यांपकी एक नागालँड हे राज्य राष्ट्रीय वृत्तपत्रांच्या झोतामध्ये फारसे नसते. असलेच तर, त्या बातम्या ‘नागा बंडखोर नेत्यांशी पुन्हा चर्चा’ अशा प्रकारच्या असतात. ही बंडखोरी फार जुनी आहे. आपल्या देशात सर्वात प्रथम बंडखोरी याच प्रदेशात १९५० च्या दशकामध्ये सुरू झाली. भारतीय सैन्याने ३० वर्षे केलेल्या बंडखोरीविरोधी कारवाईमुळे बंडखोरांना भारत सरकारशी वाटाघाटी करण्यास भाग पडले. आत्तापर्यंत वाटाघाटीच्या शेकडो फेऱ्या झाल्या आहेत (भारतात नव्हे थायलंडमध्ये), पण बंडखोरांच्या अवास्तव, बेकायदा आणि देशविरोधी मागण्यांमुळे फारसे यश मिळालेले नाही. बंडखोर आणि भारतीय सैन्यामध्ये गेली अनेक वर्षे शस्त्रसंधी (सीझफायर) लागू आहे. यामुळे शांतता प्रस्थापित झाली, तसे बांगलादेशी घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. सध्या नागालँडमध्ये नागालँड पीपल्स पार्टीचे सरकार आहे; तर ‘नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’ (एनएससीएन) ही प्रमुख बंडखोर संघटना गेल्या दोन दशकांपासून तीन गटांत विभागली गेली आहे. एनएससीएन - आयझॅक, मुईवा गट (शस्त्रधारी : सहा ते सात हजार), एनएससीएन खपलांग गट  (शस्त्रधारी : दोन ते तीन हजार) आणि एनएससीएन- कितोवी, खोले गट (शस्त्रधारी: ५०० ते एक हजार) असे बलाबल असलेल्या या संघटनांनी गेल्या काही वर्षांत नागालँडमध्ये प्रत्यक्ष हिंसाचार घडवला नसला, तरी ‘भारत सरकारपेक्षा आपण वेगळे’ हा ताठा कायम ठेवला आहे.
१९९७ सालापासून भारतीय सैन्य आणि नागा बंडखोर यांच्यामध्ये युद्धविराम सुरू आहे आणि बंडखोरांच्या सरकारशी वाटाघाटी सुरू आहेत, पण भारतीय सैन्याने केलेल्या त्यागामुळे जसा हिंसाचार कमी झाला, पण  बांगलादेशी घुसखोरीचे प्रमाण मात्र वाढले आहे. ईशान्य भारतात गेल्या पाच वर्षांत ३७८ अधिकारी आणि सैनिकांनी शांतता प्रस्थापित करण्याकरिता आपले प्राण गमावले. याच काळामध्ये २७६५ बंडखोरांना मारण्यात आले. एकटय़ा नागालँडमध्ये ९० अधिकारी आणि सैनिकांनी शांतता प्रस्थापित करण्याकरिता आपले प्राण गमावले.

भारतात सर्वात जास्त घुसखोरी
१९८० ते १९९१ मध्ये नागालँडची लोकसंख्या ५७.०८ टक्के वाढली. १९९१-२००१ मध्ये आणखी जास्त म्हणजे ६४.४१ टक्के वाढली. लोकसंख्यावाढीचे हे प्रमाण संपूर्ण भारतात सर्वात जास्त होते. आसामच्या सीमेला लागून असलेल्या दिमापूर आणि वोखा जिल्ह्य़ात तर हे प्रमाण प्रचंड म्हणजे ९५ टक्के होते. (देशातले सर्वात अधिक) अर्थातच ही वाढ बांगलादेशी घुसखोरांमुळे होती. मात्र २०११ च्या जनगणनेचे जे प्राथमिक आकडे जाहीर झाले आहेत, त्यानुसार नागालँडची लोकसंख्या ०.४७ टक्क्यांनी घटून १९८०० वर आली आहे.
घुसखोरांची संख्या नागालँड सरकारच्या मोजदादीप्रमाणे दोन लाख आणि नागा बंडखोरांच्या ‘एनएससीएन - आयझॅक - मुईवा गटा’च्या म्हणण्याप्रमाणे ती तीन लाख आहे. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असे की, हे लोक फक्त बांगलादेशातून आलेले नसून शेजारील आसामातूनही आलेले आहेत. नागालँड सरकारने पकडलेल्या प्रत्येक घुसखोराकडे आसाम सरकारच्या नोकरशाहीने बनवून दिलेली सर्व ओळखपत्रे होती, जी अजून सामान्य नागा जमातीकडे नाहीत.

नवी सुमिया जमात
नागालँडमध्ये १६ मोठय़ा जमाती आहेत. प्रत्येक जमातीची वेगळी भाषा, पोशाख आणि रीतिरिवाज आहेत. या जमाती एकमेकांशी लग्न करायलाही तयार नसतात. मात्र अनेक घुसखोरांनी नागा मुलींशी लग्ने करायला सुरुवात केली आहे. जमातीच्या बाहेर लग्न न करणाऱ्या नागा मुलींनी आता बांगलादेशी मुस्लिमांसोबत संसार थाटले आहेत. याविषयी तिथले राजकीय पक्ष उघडपणे बोलायला तयार नसतात, पण सूमी (किंवा सेमा) जमातीच्या नागा मुली आणि बांगलादेशी यांच्या संततीला आता नागा न म्हणता ‘सुमिया’ जमात म्हटले जाते. थोडक्यात, १९ ते २० लाख लोकसंख्येच्या नागालँडमध्ये घुसखोरांची संख्या तीन लाख- म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास असली तरी राज्यभरचे नागा विविध जमातींत विभागले गेल्यामुळे आज घुसखोर हीच नागालँडची सर्वात मोठी जमात बनली आहे.
हे घडले कारण नागालँडच्या सामान्यांना मजुरी किंवा शारीरिक मेहनतीची कामे करायला आवडत नाही. त्यांची पुष्कळशी शेती घुसखोर करतात. नागालँडमध्ये शारीरिक श्रमाची कामे हे घुसखोर कमी पैशामध्ये करतात. राजधानी कोहिमाचे प्रवेशद्वार ठरलेले दिमापूर तर ‘मिनी बांगलादेश’ बनले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, नागालँडच्या अन्य भागांत वास्तव्यासाठी बिगरनागांना ‘परमिट’ आवश्यक असते, परंतु दिमापूरमध्ये अशा परवान्याविना राहता येते.
अनेक वेळा नागा बंडखोरांनी घुसखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण बांगलादेश सरकारच्या डीजीएफआय या गुप्तहेर संस्थेपुढे नागा बंडखोरांचे काही चालत नाही, असे दिसते. याचे कारण, बंडखोरांचे ट्रेनिंग कॅम्प हे बंगाल देशामध्ये होते. बंडखोरांना अनेक प्रकारची मदतदेखील तिथून मिळते. आसाममधली सर्वात मोठी हिंसक संघटना ‘उल्फा’ हीदेखील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याकरिता अस्तित्वात आली होती, पण त्यांचे कॅम्प बांगलादेशमध्ये असल्यामुळे उल्फा आता घुसखोरांविषयी काहीच बोलायला तयार नाही.
या लेखामध्ये वापरण्यात आलेले आकडे आणि टक्केवारी ही संरक्षण मंत्रालयाच्या ‘आयडीएसए’(Institute for Defence Studies and Analyses) या थिंक टँकच्या २००५ च्या तयार केलेल्या रिपोर्टमधून घेतलेली आहे. अर्थातच यामध्ये आता फरक पडलेला असू शकतो. मात्र एक खरे की, घुसखोरांमुळे नागालँडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थिती मोठय़ा प्रमाणामध्ये बिघडली आहे. या राज्यात साक्षरतेचे प्रमाण आहे सुमारे ८० टक्के आणि शिक्षणप्रसार मोठा आहे, परंतु नागा युवकांमध्ये नोकऱ्या आणि काम न मिळाल्यामुळे मोठा असंतोष पसरत आहे. नागालँडमध्ये पकडलेल्या घुसखोरांना परत घ्यायला आसाम आणि बांगलादेश तयार नाही. नागालँडचे माजी मुख्यमंत्री जमीर (महाराष्ट्राचे माजी राज्यपाल) यांनी घुसखोरी हा एक मोठा धोका आहे, हे मान्य केले आहे. मात्र अनेक वेळा नागालँडमध्ये पकडलेल्या घुसखोरांना आसाममधल्या मुस्लीम संघटनांनी बांगलादेशमध्ये पाठविण्याच्या आधीच त्यांना आसाममध्ये ठेवून घेतले. आसामच्या विधानसभेवर बांगलादेशी घुसखोरांनाच पाठीशी घालणाऱ्या आमदारांची पकड एवढी मजबूत आहे की, घुसखोरांना परत पाठवणे जवळपास अशक्य आहे.
ईशान्य भारतातील लहान राज्यांना बंगाल घुसखोरीचा धोका हा उशिरा का होईना पण आता कळला आहे, पण आसाम सरकार आणि घुसखोरांच्या बाजूचे राजकीय पक्ष काहीच करू देत नाहीत. ज्या पद्धतीने ही घुसखोरी चालू आहे, ते पाहता ईशान्य भारतातील अन्य राज्यांतही आसामसारखा भडका कधीही उडू शकतो.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream