प्रशांत पाटील (AIR-44)
प्रशांत पाटील याने यंदाच्या युपीएससी परीक्षेत देशात चव्वेचाळीसावा तर महाराष्ट्रात चौथा येण्याचा बहुमान पटकावला आहे. महान्यूजसाठी त्याची मुलाखत घेण्याचा योग आला. त्याचे व्यक्तिमत्व आणि प्रयत्नही जाणून घेता आले. 'स्पर्धेतील यशासाठी स्वयं अध्ययन हाय राजमार्ग' असल्याचे सूत्र मुलाखतीतून प्रकट झाले. प्रश्नोत्तरुपी मुलाखतीमधून स्पर्धा परीक्षेचे महत्व , परीक्षेची पूर्व तयारी , सराव , मार्गदर्शन आणि बरेच काही जाणून घेता आले.
प्रश्न : एमपीएससी, युपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात, असे आपणांस का वाटले प्रेरणा कुणी दिली?
उत्तर : माझे बाबा, दाजी आणि मामा हे शासनाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी आहेत. खरी प्रेरणा वडिलाकडून मिळाली. ते शासकीय सेवेत मोठय़ा पदावर आहेत. माझे मामा शामसुंदर शिंदे (आयएएस) व दाजी रावसाहेब शिंदे (आयपीएस) यांच्याकडूनही मला मानसिक पाठबळ, प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली.
या सर्वांनी लोकाभिमुख कामे केली. आपणही गरिबांच्या जीवनात समाजऋण फेडण्यासाठी चांगला बदल करावा असे वाटत होते. त्यामुळेच या क्षेत्राकडे जाणिवपूर्वक वळलो.
प्रश्न : आपल्या शैक्षणिक प्रगतीबद्दल काय सांगता येईल ?
उत्तर : ठाण्याच्या सरस्वती विद्यालयातून ८७ टक्के गुण घेऊन मी एस.एस.सी. उत्तीर्ण झालो. मुलूंडच्या केळकर महाविद्यायालतून बारावी पास झालो. पीसीएम गटात ९४ टक्के गुण मिळाले. मुंबई विद्यापीठातून सिव्हील इंजीनिअरींग या परीक्षेत सर्वांमध्ये द्वितीय आलो. त्यानंतर मला कंपनीत चांगले काम मिळाले, पण नागरी सेवेत जायचेच असे ठरविल्याने तेथे रुजू झालो नाही. २००८ साली एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला आलो. त्यातून आत्मविश्वास वाढला आणि युपीएससीचे वेध लागले.
प्रश्न : युपीएससीसाठी कोणते विषय निवडले आणि तेच का ?
उत्तर : या परीक्षेसाठी भूगोल व मानसशास्त्र विषय निवडले. या विषयांचे ज्ञान प्रशासन चालविताना पदोपदी उपयोगाचे ठरणार आहे. शिवाय विज्ञान शाखेतील विषयाच्या तुलनेत या विषयांचा अभ्यासक्रम कमी असतो. स्पर्धेत पुढे जाण्यासाठी सारासार सोयीचे आवडीचे विषय निवडणे महत्वाचे असते.
प्रश्न : वैकल्पिक विषयासाठी कोणती पुस्तके उपयुक्त ठरली ?
उत्तर : नेमकेपणाने एखाद्या लेखकाचे अचूक पुस्तक वापरावे असे म्हणण्याचे मी धाडस करणार नाही. एकाच विषयाचे विविध भाग वेगवेगळ्या पुस्तकात चांगले दिलेले असतात. ज्या पुस्तकातला जो पाठ सोपा वाटला आणि आवडला त्याचा अभ्यास त्या पुस्तकातून करावा. त्यासाठी तुम्हाला अनेक पुस्तकांकडे धाव घ्यावी लागेल. यश मिळवायचे असेल तर एवढे कष्ट घायलाच हवेत ना !
प्रश्न : आपण परीक्षेचा सराव कसा केला ? आपल्या दृष्टीने कोचींग क्लासची उपयुक्तता काय ?
उत्तर : मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविल्या. तज्ज्ञ गुरुजनांकडून त्या तपासून घेतल्या आणि आवश्यक तेथे सुधारणा करण्यावर भर दिला.
क्लास केल्यामुळे ४-५ महिन्यात संपूर्ण अभ्यासक्रमांचे स्वरुप लक्षात येते. योग्य दिशा मिळते. या मर्यादेत क्लासला नक्कीच महत्व आहे. केवळ क्लास केले म्हणजे काम झाले असे कोणी समजू नये. हमखास यशासाठी स्वयं अध्ययनासारखा अन्य राजमार्ग नाही, ही खूणगाठ बांधली पाहिजे.
प्रश्न : यशाची गुरुकिल्ली काय आहे ?
उत्तर : स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी 'स्वयं अध्ययनासारखा अन्य कोणताही श्रेष्ठ राजमार्ग नाही'. त्यासाठी स्पर्धकाने निवडलेल्या विषयांचा जिद्दीने, चिकाटीने व सातत्याने अभ्यास करायला पाहिजे. वाचन, मनन, चिंतन आणि लेखन या घटकांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात अनन्यसाधारण महत्व आहे, याची मनाशी पक्की खूणगाठ बांधली पाहिजे.
प्रश्न : स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे ? यशासाठी नशिबाची कितपत साथ लागते ?
उत्तर : खरं म्हणजे नशीब असायलाच हवे, पण परिश्रमात नशिबाला बदलण्याची ताकद असते हे विसरुन चालणार नाही. थोडक्यात कर्माची पूजा करा, आपले नशीबही आपल्या मागे धावेल.
स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, सातत्य बाळगले पाहिजे. वाचन, मनन, चिंतन या त्रिसूत्रीवरही भर दिला पाहिजे.
प्रश्न : राज्य आणि देश यांच्या प्रगतीसाठी काय करणे आवश्यक वाटते ? मिळालेल्या संधीचे कशा प्रकारे सोने कराल ?
उत्तर : लोकांचे शिक्षण आणि आरोग्य याकडे लक्ष देणे , त्यात सुधारणा करणे आवश्यक वाटते. गोरगरीब जनतेसाठी राबविण्यात येणारी रास्त धान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक बनविणे गरजेचे आहे.
कर्तव्य पार पाडताना सचोटी, अथक परिश्रम व नियमांचे तंतोतंत पालन याकडे खास लक्ष देईन. आपण गरिबासाठी सेवा देतो हे कदापि विसरणार नाही.
प्रश्न : स्पर्धकांना यश मिळविण्यासाठी काय कानमंत्र द्याल ?
उत्तर : प्रथम ध्येय निश्चित करावे. जिद्द, चिकाटी व सातत्य बाळगून ध्येयाकडे वाटचाल करावी. त्याचवेळी लेखन करण्यावर अधिक भर द्यावा म्हणजे यश हाती येईल, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
प्रश्न : यशस्वी होण्यामध्ये सर्वाधिक मोलाचे मार्गदर्शन कोणाचे ?
उत्तर : आदरणीय अविनाश धर्माधिकारी यांचे मौलिक नव्हे तर अनमोल मार्गदर्शन मिळाले. मुलाखतीच्यावेळी कोणते कपडे वापरावेत, आवाजात केंव्हा चढ,उतार असावेत यासह अजून कोणत्या गोष्टी कराव्यात, काय टाळावे याबाबींचे त्यांच्याकडून ज्ञान मिळाले. माझ्या व्यक्तिमत्व कौशल्यात गुणात्मक बदलही त्यांच्यामुळेच घडू शकला. त्यामुळे माझ्या यशात त्यांचे योगदान एका दीपस्तंभासारखे राहिले.
प्रशांत पाटील याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यातही टिकून होती. गरिबांच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्यासाठी नागरी सेवेत दाखल होण्याची त्याची तळमळ मनाला चटक लावून गेली. ज्या समाजात जन्मलो, वाढलो, शिकलो त्या समाजासाठी काहीतरी चांगले करायचेच हा निर्धार त्याच्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे, असे वाटत होते. मुलाखतीला विराम मिळाला. प्रशांत पाटलाने ' पुन्हा भेटूया ' असे म्हणत स्मित हास्य करीत निरोप घेतला. त्याचे ' स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी स्वयं अध्ययन हाच श्रेष्ठ राजमार्ग आहे ' हे अनुभवाचे बोल स्पर्धकासाठी मंत्र आहेत, असे वाटते.