शीतल उगले (IAS)
कुठलीही परीक्षा द्यायची तर त्याचा फॉर्मेट समजून घेणं महत्वाचं आहे आणि युपीएससीच्या बाबतीत तर हे विशेषत्वाने लागू आहे. सांगतेय मराठी लिटरेचर घेऊन मराठी मीडियममधून युपीएससीमध्ये महाराष्ट्रात दुसरी आणि भारतात 37 वी येऊन आयएएस झालेली शीतल उगले.
प्रेरणा -
मला आठवतं की लहानपणापासून मला गाड्यांचं प्रचंड आकर्षण होतं. माझे मामा प्रशासकीय अधिकारी होते. त्यामुळे गाडी कशी मिळते तर कलेक्टर व्हायचं असं डोक्यात बसलेलं. त्यामुळे लहानपणापासूनच नकळत प्रशासनात जायचं असं मनाने घेतलं. त्यानतंर जसजशी हळूहळू मोठी होत गेले तसं प्रशासनाचं महत्व कळलं आणि मग जाणीवपूर्वक निर्णय घेतला की प्रशासनात जायचं.
पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी -
बी.ए. झाल्यावर मी एक ते दीड वर्ष पूर्ण युपीएससीच्या तयारीसाठी दिलं. युपीएससीच्या तयारीच्या माझ्या मते 5 पायऱ्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला खरंच युपीएससीची परीक्षा द्यायची आहे का हे पहिले पक्कं करा
2) हे ठरल्यावर मग ऑप्शनल सब्जेक्ट्स निवडा
3) कोणत्या भाषेतून म्हणजेच मीडियममधून तुम्ही परीक्षा देणार आहात हे ठरवा
4) एखादा क्लास जॉईन करायचा आहे का आणि असल्यास तो कुठला हे निश्चित करा
5) आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युपीएससी परीक्षेची फ्रेम समजावून घ्या. त्यासाठी पेपर पॅटर्न, सिलॅबस याचा चांगला अभ्यास करा.
बी.ए.ला राज्यशास्त्राचं गोल्डमेडल होतं त्यामुळे अर्थातच माझा एक ऑप्शनल राज्यशास्त्र होता आणि दुसरा मराठी लिटरेचर. मी मागच्या 5 वर्षांच्या पेपरचा सखोल अभ्यास केला. पूर्व आणि मुख्य परीक्षेचे भरपूर पेपर सोडवले. आणि महत्वाचं म्हणजे सिलॅबस आणि पेपर समोर ठेऊन मग पुस्तकं वाचले. मराठी लिटरेचर हा विषय माझ्यासाठी पूर्ण नवा असल्याने मी प्रिलीम व्हायच्या आधीच मराठीचे क्लास लावले होते आणि सिलॅबस पूर्ण केला होता.
संदर्भ पुस्तकं-
राज्यशास्त्र -
राज्यघटनेसाठी -
डी.डी. बसू
बी.एल. फडिया
विचारवंत आणि संकल्पना
सेबाईन
भोळे आणि डोळे यांची पुस्तकं
तुलनात्मक राज्यशास्त्र - जे.सी. जोहरी
राज्यशास्त्र पेपर दोन-
महेंद्र कुमार
गोल्डस्टेन
हिंदू पेपर
मराठी लिटरेचर
पेपर एक
प्रदक्षिणा खंड 1 आणि 2
व्याकरण - लीला गोविलकर
पेपर दोन-
अभ्यासक्रमातील सर्व पुस्तकं वाचणं आवश्यक. नेमून दिलेल्या पुस्तकातील कवितेच्या ओळी आणि कोट्स याचा वापर उत्तर लिहिताना करावा.
मुलाखतीची तयारी-
मुलाखतीसाठी मी एवढेच सांगेन की नॅचरल रहा. उगीच तुम्ही किती स्मार्ट आहात हे दाखवायला गेलात तर नुकसान होण्याचीच शक्यता जास्त आहे. तुमचा प्रामाणिकपणा, इनोसन्स खूप महत्वाचा आहे. कारण पॅनलमध्ये बसलेले लोक हे अनुभव, ज्ञान आणि वयाने खूपच मोठे असतात. त्यांना तुम्ही फसवू शकत नाही. मी युपीएससीचे तीन इंटरव्ह्यू दिले. तीनहीमध्ये मला जवळपास 66 टक्के मार्क्स होते. मला जेव्हा इंटरव्हूयत टिश्यू कल्चरबद्दल विचारलं तेव्हा मी प्रामाणिकपणे सांगितलं की, मी माझा त्याविषयी फारसा अभ्यास नाही. एका इंटरव्हूयला पॅनलवर पुरूषोत्तम अग्रवाल हे सदस्य होते. त्यांनी मला विचारलं की प्रत्येकाला होम कॅडर का हवं असतं? मी म्हटल की सर, प्रत्येकाला मोठेपणा दाखवायचा असतो. आपल्या राज्यात आपल्याला ओळखणारे लोक असतात तेव्हा त्यांना मोठेपणा दाखवण्यासाठी होम कॅडर हवं असतं. हे उत्तर त्यांना अपील झालं. तसंच मी संपूर्ण परीक्षा मराठी मीडियममधून दिली होती. पण इंटरव्ह्यू मी इंग्लिश मधून दिला होता. काही वेळा इंटरव्ह्यू देताना हिंदीचाही आधार घेतला. त्यामुळे पेपर जरी मराठी मीडियममधून लिहिलेत तरी इंटरव्ह्यू मात्र इंग्लिशमधून देण्याचा प्रयत्न करा असं मी सांगेन. पॅनलच्या लोकांनाही कळत असतं की तुम्ही मराठी माध्यमातून पेपर दिले आहेत. पण तुमचे प्रयत्न ते बघत असतात.
यशाचं सूत्र -
एखादा माणूस जर युपीएससीमध्ये यशस्वी नाही झाला तर तो परीक्षेच्या फॉर्मेटमध्ये नाही बसला एवढच मी म्हणेन. या परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तकांच्या प्रेमात पडण्यात अर्थ नाही. पेपरमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत ते बघून तेवढचं संबंधित पुस्तकाचं वाचन केल्यास चांगलं. भारंभार पुस्तकं वाचत बसण्यात अर्थ नाही. वाचनाच्या बाबतीतही इनपुट आणि आऊटपुट रेशोचा विचार करणं महत्वाचं आहे.