प्रशांत होळकर (IPS)


प्रशांत होळकर (IPS)


यश मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी जोखीम पत्करताना दिसत नाहीत. परिणामी यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये ते टिकत नाहीत. यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व खडतर परिश्रम याला पर्याय नाहीच; परंतु त्याचबरोबर आपला कल पाहून विषयांची निवड केली तर यश मिळणे फारसे अवघड नाही. आमच्या आयपीएस बॅचमधील अनेकांना दहावीला 55 ते 60 टक्के गुण होते; परंतु त्यांनी मोठी स्वप्ने बघितली. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कठोर मेहनतीची तयारी ठेवली. त्यामुळे यश त्यांच्याकडे चालून आले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशानंतर मला पसंतीचे पोलिस खाते मिळाले आहे. मी तसा शेतकरी कुटुंबातील. घरची फारशी शैक्षणिक पार्श्‍वभूमी नाही. पहिली ते दहावीचे शिक्षण सोमेश्‍वर विद्यालयात घेतले. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून त्यांनी बी.ई. पदवी मिळविली. त्याच वेळी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली व त्यात यशही मिळविले. हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच मी महाराष्ट्रात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाले म्हणजे संपले असे नाही. खरे तर तेथून पुढेच खरी कसोटी लागते.

एमपीएससी अथवा यूपीएससी परीक्षा कोणतीही असो, विषय निवडताना विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे. या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमात फारसा बदल नाही. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही परीक्षा डोळ्यापुढे ठेवून अभ्यास केला तरी चालेल. अवतीभवती घडणाऱ्या घटनांची नोंद आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. जगात सतत नवनवीन गोष्टी घडत असतात. त्याबाबत अधिक खोलात जाण्याची तयारी हवी. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रुपचे घटक बनले पाहिजे. ग्रुपमधील चर्चेतून अनेक विषय सहजपणे समजू शकतात.

आपल्याकडील विद्यार्थी मुलाखतीत अनेकदा अपयशी ठरतात. वेगवेगळ्या भाषा अवगत नसतात, हे त्यातील महत्त्वाचे कारण. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेनंतर ज्या वेळी दिल्लीत मुलाखती होतात तेथे इंग्रजीतून प्रश्‍न विचारले जातात. तेथे आपण आपल्या भाषेतून उत्तरे दिली तरी चालते; परंतु हिंदी अथवा इंग्रजीतून उत्तरे देणे अधिक फायद्याचे. हिंदी ही राष्ट्रभाषा असताना आपल्याला ती नीटपणे बोलता येत नाही. त्यात सुधारणा केली पाहिजे. मुलाखत म्हणजे केवळ प्रश्‍नोत्तरे नव्हे. आपले व्यक्तिमत्त्व यानिमित्ताने समोरच्या व्यक्ती जोखत असतात. त्यामुळे आत्मविश्‍वास, सामाजिक जाण व आजूबाजूच्या घटनांचे बारकावे आपल्याला माहीत असायला हवेत.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream