दिव्यदर्शनी (IAS TOPPER - 2011)
प्रेरणा -
खरं बघितलं तर माझ्या घरी प्रशासनाची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. माझे वडील कन्सल्टंट. आई गृहिणी. एक मोठा भाऊ आणि लहान बहिण.
12 वी नंतर लॉचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लॉच्या तिसऱ्या वर्षाला असताना मी ठरवलं की आपण युपीेएससीची परीक्षा द्यायची आणि आयएएस व्हायचं. मला विकास कामात सहभागी व्हायचं होतं त्यामुळे मी प्रशासनात यायचा निर्णय घेतला. आपल्या देशात कितीतरी चांगल्या योजना आहे. गरज आहे ती त्या योजना इच्छाशक्ती दाखवून राबवण्याची. प्रशासनात तुमच्या हातात अधिकार असतात, सत्ता असते, त्या सत्तेचा उपयोग आपण लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी करू शकतो. त्यामुळे मी ठरवलं की आपण प्रशासनात यायचं.
पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी-
लॉच्या फायनल इयरला असताना मी खऱ्या अर्थाने तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात मी प्रीलीमच पास होऊ शकले नाही. पण काहीही झालं तरी सर्व अटेम्प्ट द्यायचेच हा मी निर्धार केला होता. प्रीलीम फेल झाल्यावर पुन्हा मला तयारीसाठी एक वर्ष मिळालं. मी जोमाने प्रीलीमचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतात पहिली आले. प्रीलीमसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी पेपर सोडवणं हा भाग महत्वाचा होताच. त्याप्रमाणे मीही पेपर सोडवले. मी रोज भरपूर पेपर वाचन करित असे. त्याचा मला प्रीलीम, मेन्स आणि इंटरव्ह्यूत असा सर्व ठिकाणी फायदा झाला. इंटरनेटवरूनही बरीच माहिती तुम्हाला मिळू शकते. इंटरनेटचाही मी भरपूर वापर केला. याशिवाय परीक्षा आणि पेपर फार्मेट समजून घेऊन नेमकी पुस्तकं वाचली. लोकप्रशासन( पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन) आणि लॉ हे माझे मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल विषय होते.
मुलाखतीची तयारी -
माझ्या मुख्य परीक्षेसाठीच्या विषयांची म्हणजे लोकप्रशासन आणि लॉची मी नीट तयारी केली. ताज्या घडामोडींची तयारी केली. तसंच संपूर्ण बायोडाटावर काम केलं. म्हणजे आपल्या बायोडाटात अगदी नावापासून आपल्या छंदापर्यंत ते आपल्या वडिलांचा व्यवसाय या सर्व बाबींवर मी प्रश्नांची तयारी केली होती.
आणि मी पहिली आले...
खरं सांगू स्वप्नातही विचार केला नव्हता की मी पहिली येईन. माझी पहिलीच मेन्स होती कारण आधीच्या प्रयत्नात मी प्रीलीम नापास झाले होते. तेव्हा चांगली रॅंक मिळेल असं वाटलं होतं पण पहिली येईन असं नाही वाटलं. पण ज्यावेळी फोनवर कळलं की मी पहिली आलीय तेव्हा मी दोनदोनदा हेच विचारत होते की अरे! नाव चेक करा. नक्की माझंच नाव आहे ना? काही गोंधळ तर झाला नाही ना? विश्वासच बसत नव्हता. खात्री झाली तेव्हाचा आनंद मात्र अवर्णनीय आहे एवढच म्हणेन.
यशाचं सूत्र -
काहीही झालं तर सगळे अटेम्प्ट द्या असं मी नक्की सांगेन. नेव्हर गिव्ह अप हे जीवनाचं सूत्र स्पर्धा परीक्षेलाही लागू आहे. नियोजन, बुद्धिमत्तापूर्ण प्रयत्न, निर्धार, शिस्त, आणि सेल्फ मोटिव्हेशन हेच यशाचं सूत्र आहे. त्याचबरोबर हे जरूर सांगेन की तुमचा अल्टरनेट करिअर प्लॅन असू द्या. मी जर युपीएससीत अपयश आलं तर काय याचा विचार आधीच करून ठेवला होता. एकतर लॉ पूर्ण झाल्यावर मला लगेच स्टेट बॅंक ऑफ इंडियात क्लरिकलची पोस्ट मिळाली होती. तसंच माझं लॉचं शिक्षण झालेलं असल्याने मी ते करिअर निवडणार होते. थोडक्यात काय तर दुसरा करिअर प्लॅन असणं हे कधीही चांगलं.