वैभव निंबाळकर (IPS)
भव म्हणतो, ''माझ्या आईवडलांनी, बहिणीने मला केडर बदलून घे, असा कोणताही सल्ला दिला नाही.
उलट त्यांच्याकडून पाठिंबाच मिळाला. माझे वडील न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये नोकरीला, आई गृहिणी, बहीण हिंदी-मराठी सीरियल्समधून अभिनय करते. माझे मात्र सिव्हिल सर्व्हिस हेच ध्येय होते.
अगदी लहान असल्यापासून मला खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने आपण आयएएस किंवा तत्सम परीक्षा देऊन 'सर्व्हिस'मध्येच यायचे, असेच ठरवले होते. खरे तर बारावीला उत्तम गुण मिळाले होते. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता तरीही बी. एस्सी.ला प्रवेश घेतला आणि यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झालो. देशपातळीवर 204 वा नंबर मिळवून आयपीएस झालो. पण मी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो नसतो तर गणित विषयाचा शिक्षक किंवा प्राध्यापक झालो असतो. कारण गणित माझा पहिल्यापासून आवडता विषय आहे. माझ्या मते यूपीएससीची तयारी करण्यासाठी खंबीर मानसिकतेची गरज असते. त्यासाठी कसून अभ्यासही करावा लागतो. या परीक्षांसाठी मी सोशॉलॉजी आणि मराठी साहित्य हे विषय घेतले होते. त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयावरील लेख, वर्तमानपत्रे, वेगवेगळी मासिके यांचे वाचन केले. यामुळे 'आउट ऑफ बॉक्स थिंकिंग' करण्यास मदत होते. याचा प्रत्यय मला मुख्य परीक्षेच्या दरम्यान आला. म्हणून मराठी साहित्य आणि निबंध या लेखी परीक्षांमध्ये मी 'रँक होल्डर' ठरलो.''
वैभवला आयपीएसचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पहिलेच पोस्टिंग आसाममधील 'बोकाखाट' जिल्ह्यात मिळाले. याच जिल्ह्यात भारतातील प्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याचा बराचसा भाग येतो. परंतु आसाम म्हणजे भारताचा दुर्लक्षित, सर्वार्थाने उपेक्षित असा उत्तर-पूर्व भाग. शेजारच्या राष्ट्रांमधून घुसखोरी. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना साक्षी असलेला अशांत टापू. यावर वैभव म्हणाला, ''बरोबर हेच चित्र माझ्या डोळ्यासमोर होते. अर्थात हे सर्व खोटे होते, अशातला भाग नाही. मीदेखील आसाम यापूर्वी पाहिला नव्हता. लोक कसे असतील? प्रत्यक्ष शासकीय कामाचा अनुभव नव्हता. मी स्वत: उपरा माणूस. स्वीकारतील का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. मी 13 सप्टेंबर 2011 रोजी 'एसडीओ' म्हणून चार्ज घेतला. या जिल्ह्याच्या हद्दीत काझीरंगा अभयारण्याचा मोठा प्रदेश येतो. त्यामुळे अर्थातच वन्यजीव तस्करांचा मोठा धोका या भागात आहे. आसाम प्रदेश गेंड्याच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असून या प्राण्याची हत्या मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या केली जाते. आमच्या पोलिस दलाने 'अँटिपोचिंग' मोहीम सुरू केली आहे.
वनसंपत्तीच्या तस्करींमध्ये मुख्यत: नागालँडमधील लोक गुंतले आहेत. 'उल्फा' ही संघटना आजही काही प्रमाणात कार्यरत असली तरीही सामान्य आसामी हे राज्याच्या प्रगतीला हातभार लावणार्या प्रत्येक व्यक्तीस आपला मानतात. इतकेच नव्हे, तर पोलिस दलाबद्दल प्रचंड आदर असल्यामुळे आसामी लोकप्रतिनिधी पोलिस दलाच्या विकासासाठी शासन पातळीवर खास प्रयत्न करताना दिसून येतात. आसामी लोक शांतताप्रिय असून आपली संस्कृती, भाषा याबद्दल त्यांना खूप ममत्व आहे. यामुळेच आसामी लोकांबरोबर पहिल्या दिवसापासून माझे सूर जुळले.'' वैभव निंबाळकरांच्या या वाक्याची प्रचिती 'दिल हुम हुम करे घबराये..' या गाण्याच्या मोबाइल ट्यूनमुळे अधिकच जाणवते.