अय्याज तांबोळी (IAS)


अय्याज तांबोळी (IAS)

प्रेरणा -
जीवनात काहीतरी विशेष करावं अशी इच्छा होती आणि त्यातच बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात 2001 साली शिकत असताना डॉ. श्रीकर परदेशी व डॉ. विजय पिंगळे ही परीक्षा उत्तीर्ण झाले व मी निर्णय पक्का केला. मात्र पूर्णवेळ तयारी पदवीनंतर सुरू केली.

पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी -
यूपीएससी ची परीक्षा ही तीन टप्प्यात म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मौखिक याक्रमाने होते. मात्र तयारीचा क्रम पूर्णत: उलटा आहे. सर्वात प्रथम मौखीक परिक्षेची तयारी म्हणून कॉलेजमध्ये असताना बायोडाटा डेव्हलप करण्यावर भर दिला. यासाठी गिर्यारोहणाचा छंद जोपासला. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करताना विविध कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेतला. पुण्यात पुरुषोत्तम करंडक असो वा शनिवारवाड़ा महोत्सव, न चुकता हजेरी लावत होतो. तसेच डीमार्फ या संस्थेसोबत त्सुनामीग्रस्त व कोकणच्या पुरग्रस्त भागात काम केले. या सगळ्या अॅक्टिव्हिटीजमधून ज्ञानसंवर्धन व व्यक्तिमत्व विकास होत गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे यूपीएससीचा इंटरव्ह्यू याच सर्व बाबींवर झाला. जो खूप चांगले गुण देऊन गेला.

कॉलेजच्या दिवसामध्येच अक्षर बिघडू न देता लिखाणाचा वेग वाढवणे, कोर्‍या कागदावर सरळ रेषेत लिहण्याची सवय करणे, भारत-जग-राज्ये यांचे नकाशे हाताने काढ़णे, वृत्तपत्र-मासिके यांचे नियमित वाचन करून टिपण बनवणे यावर लक्ष दिले.

मुख्य परीक्षा हा प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा, सर्वाधिक निर्णायक; म्हणून यासाठी पूर्ण योजनाबद्ध तयारी आवश्यक आहे. मुख्य परिक्षेमध्ये आवश्यक गोष्ट म्हणजे सामान्य ज्ञान,ऐच्छिक विषयांचा संमतोल व समग्र अभ्यास. यासाठी खालील दृष्टिकोण महत्वाचा आहे.
1) सामाजिक आणि राजकीय विषयांसंबंधीची माहिती आणि अभ्यास
2) सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे ते साध्य करण्यातल्या अडचणी यांचं आकलन
3) नेमकं आणि अचूक उत्तर लिहण्याचा सराव

अभ्यासक्रमाचा बारकाइने अभ्यास करून पूर्वी आलेल्या प्रश्नांचे स्वरूप समजून घ्या. चर्चा करा, टीकात्मक विश्लेषण करा, मूल्यमापन करा, स्पष्टीकरण करा या प्रत्येक शब्दबरोबर प्रश्नचा अर्थ बदलतों म्हणून उत्तरातही बदल आवश्यक. प्रश्नपत्रिका तयार करणारा आणि पेपर तपासणार्‍याच्या भूमिकेतून प्रश्नांकडे बघण्याची सवय लावून घ्या. सर्वात म्हत्वाचे म्हणजे प्रश्नास अनुसरून स्वत:चं व्यक्तिमत्व आणि वेगळेपण उत्तर लिहिताना सिढ्ध करावं. बरेचजण शब्दमर्यादेत उत्तर लिहावं लागतं याचा बाऊ करुन घेतात, उत्तर लिहिताना पहिली मर्यादा पाळायची ती म्हणजे समर्पक व पुरेपुर उत्तर. दूसरी मर्यादा वेळेची आणि शक्य झाल्यास शब्दाची. एनसीइआरटीची पुस्तके विशेषत: सामान्यज्ञान व भूगोल,इतिहास यासारख्या ऐछिक विषयासाठी मूलभूत आधार आहेत त्यांचा जरूर वापर करावा.

पूर्व परिक्षेविषयी:
पूर्व परिक्षेत दोन पेपर असतात- सामान्यज्ञान व सी-सॅट. सामान्यज्ञानासाठी चालू घडामोडी,भूगोल,इतिहास,राज्यघटना,आंतरराष्ट्रीय संबंध यावर विशेष भर देताना अर्थशास्त्र,विज्ञान-तंत्रज्ञान याकडे दुर्लक्ष करू नये. द हिन्दू,क्रॉनिकल यांचे वाचन व टिपण काढणे आवश्यक आहे. सी-सॅट बद्दल गांगरून न जाता बु्द्धिमत्ता चाचणी आणि उतारा वाचून प्रश्न सोडवण्याचा नियमित सराव करावा. मात्र मूख्यपरिक्षेची मूलभूत तयारी न करता पूर्व परीक्षा देणे अयोग्य.




याव्यतिरिक्त काही बाबी लक्षात घ्या
यूपीएससीचा पेपर पॅटर्न दर वर्षी काही प्रमाणात बदलतों.(Element of surprise is always there) त्यामुले न गोंधळता बदलांना सामोरे जा.
ही परीक्षा हा एक सापेक्ष गुणांवर आधारित मनोवैज्ञानिक लढा असल्याने इतरांपेक्षा तुमची तयारी चांगली असेल तर यशाची संधी आहे.म्हणून कच न खाता लढा,यश तुमचेच आहे.
सामान्यज्ञानासाठी basic पुस्तके:
1) स्पेक्ट्रमचे मॉडर्न हिस्ट्री ऑफ इंडिया
2) ११ वी आणि १२ वीची भूगोलसाठीची एनसीइआरटीची पुस्तकं, ओरिअंट लाँगमन आणि आॅक्सफर्डचा अॅटलास
3) राज्यशास्त्रासाठी लक्ष्मीकांत यांचं पुस्तक
4) योजना आणि क्रॉनिकल हि मासिकं
5) द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस

स्वत:विषयी थोडेसे -
दोन वर्षापूर्वी माझी भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्ति झाली त्यानंतर लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासनिक अकादमी,मसूरी येथून प्रशिक्षण पूर्ण केले.तसेच सहायक क्लेक्टर म्हणून नागालँड मधील सर्वात दुर्गम व मागासलेल्या पण तितक्याच निसर्ग-सुंदर, कोन्याक आदिवासीबहुल मोन या भारत-म्यांमार सीमेवरील जिल्ह्यात काम केले.सध्या तितक्याच निसर्गसुंदर-संपन्न, आदिवासी संस्कृतिने नटलेल्या बस्तर जिल्ह्यात (छत्तीसगढ़) सहायक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहे.या दोन्ही ठिकाणी काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे आयुष्य खूप साधं पण खड्तर आहे. इथलं जीवन बघताना येणारा आणखी एक अनुभव म्हणजे भारत हा आदिमानवपासून ते चंद्रमानवापर्यंतचा (किमान पाच – सहा हजार वर्षांचा) जिवंत इतिहास आहे.
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream